ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

गटारांमधील गुदमरणं कधी थांबणार?

गटारसफाईचं मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण केलं तर मानवांना या गटाररूपी मृत्युखोल्यांमध्ये उतरावं लागणार नाही.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

दिल्लीत दोन निरनिराळ्या घटनांमध्ये मिळून सहा गटारसफाई कामगारांना प्राण गमवावे लागले. अशा स्वरूपाच्या मृत्यूमालिकेतील ही नवीन भर होती. परंतु, अधिकारीसंस्थांचा यावरचा प्रतिसाद पाहिला, तर असे मृत्यू त्यांच्या लेखी स्वाभाविक ठरत असल्याचं दिसतं. ‘स्वच्छ भारता’विषयीची भाषणबाजी एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छतेसाठी महत्त्वाचे असणारे लोक अस्वीकारार्ह असंवेदनशीलतेला सामोरं जात आहेत.

गरीबीच्या दबावामुळं या कामगारांना जवळपास उघड्यानं गटारात उतरावं लागतं. घाण आणि मैला यांनी भरलेल्या या गटारांमध्ये गुदमरून अनेकांचा जीव गेलेला आहे, हे माहीत असूनही त्यांना हा धोका पत्करावा लागतो. अशा प्रकारच्या क्रूर मृत्यूनंतर काही नेहमीचे प्रश्न उपस्थित केले जातात, यातील एका प्रश्नाला तातडीनं उत्तर मिळणं आवश्यक आहे: यांत्रिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध असताना आणि कायद्यानं असं यांत्रिकीकरण बंधनकारक केलेलं असतानाही कामगारांना घाणीत का उतरावं लागतं?

या कामगारांना सुरक्षिततेची साधनं उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्या दुर्दशेमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी दीर्घ काळ प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नसल्याबद्दल वेळोवेळी खंत व्यक्त केली आहे. देशात हाती मैला सफाई करावे लागणारे कामगार किती आहेत, याचं दस्तावेजीकरण झालेलं नाही. असं दस्तावेजीकरण झालं तर हाती मैलासफाई केली जाते ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. माध्यमांमधील वार्तांकनं आणि राज्य विधानसभा व संसदेमध्ये सरकारच्या वतीनं देण्यात आलेली उत्तरं, यांवर आधारलेले भिन्न व गोंधळवणारे आकडेवारीचे अंदाज उपलब्ध आहेत. खरं तर, ‘मैला सफाई रोजगार व सुक्या संडासांची बांधणी (प्रतिबंध) अधिनियम, १९९३’ आणि २०१३ साली या कायद्यात झालेली दुरुस्ती, यांनुसार कोणत्याही व्यक्तीला, स्थानिक प्रशासनाला वा संस्थेला गटार व मैलाटाक्यांच्या हानिकारक सफाईसाठी लोकांना कामावर घेता येत नाही.

सर्वांत कनिष्ठ जातींमधील या सफाई कामगारांची दुरावस्था समाजाला व भारतातील अधिकारीसंस्थांनाही दखलपात्र वाटत नाही, हे यावरून स्पष्ट होतं. रस्ते झाडणारी, गटारं व दोन इमारतींमधील बोळ आणि मैला-टाक्या साफ करणारी ही बिनचेहऱ्यांची माणसं असतात. स्वच्छ भारत अभियानासाठी प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या या लोकांकडं अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि त्यांच्या आर्थिक स्त्रोतांच्या बाबतीत तर पूर्ण अनास्था दाखवली जाते, याकडं वेळोवेळी अनेकांनी लक्ष वेधलेलं आहे. झाडू घेऊन जाणाऱ्या तारेतारखा व मंत्री हे ‘स्वतःच्या सावल्या झाडत असतात, देश स्वच्छ ठेवण्याचं काम आम्ही करतो’, असं वस्तुस्थितीदर्शक विधान मुंबईतील कचरा वाहतूक श्रमिक संघानं केलेलं आहे.

कचरा साफ करण्याचं काम आणि कनिष्ठ जाती यांच्यातील संबंध समाजात खोलवर रुजलेले आहेत, त्यामुळं अडचणीची गटारं साफ करण्यासंदर्भातील यांत्रिकी नवशोधनामध्ये फारसा रस दाखवला जात नाही व त्यासाठी आवश्यक तितके प्रयत्न केले जात नाहीत. वेगानं व अस्ताव्यस्तपणे नागरीकरण होत असलेल्या देशात स्वच्छतेची व्यवस्था- (शहरांचे ‘कोठे साफ करणं’ असं याला संबोधलं गेलं आहे)- ही शहरांच्या सुरळीत कामकाजासाठी अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, बंगळुरू इथं सदनिकांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करणारं केंद्र त्या सदनिकांच्या आवारातच असू शकतं आणि नागरी प्रशासनाच्या मदतीशिवाय या केंद्राची दुरुस्ती व देखरेखही सदनिकांना स्वतःच्या जबाबदारीवर करता येणं शक्य आहे. याचा अर्थ, खाजगी संस्था व कंत्राटदारांना हे काम करण्यासाठी नियुक्त केलं जातं आणि ते प्रासंगिक तत्त्वावर कामगारांना रोजंदारीवर या कामाला जुंपतात. यामध्ये सुरक्षिततेचा कोणताही विचार केला जात नाही. दिल्लीत अलीकडंच सहा गटार सफाई कामगारांचा मृत्यू झाला, त्यामधील पाच जणांच्या मृत्यूला सुरक्षिततेविषयीचा संबंधित संस्थांचा निष्काळजीपणाच कारणीभूत होता.

सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या एका प्रमुख कार्यकर्त्यानं निर्देश केल्यानुसार, भारताकडं उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठीचं तंत्रज्ञान आहे, पण केवळ २० फूट वा कमी खोली असलेली गटारं व मैला-टाक्या साफ करण्यासाठीचं तंत्रज्ञान मात्र नाही. या पार्श्वभूमीवर, काही ठिकाणी मात्र देशी बनावटीच्या यंत्रांद्वारे किंवा इतर मार्गांनी सफाईकाम सुरक्षित करण्याचे प्रशंसनीय प्रयत्न होत आहेत. हैदराबाद महानगर जलपुरवठा व नाले मंडळानं वापरलेल्या जेट्टिंग मशिनचा दाखला अनेकदा दिला गेलेला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम इथं काही सामाजिक संवेदना बाळगणाऱ्या अभियंत्यांनी ‘बँडिकूट’ असं एक रोबोसदृश यंत्र तयार करून यासंबंधी प्रयोग केले आहेत. शिवाय, हैदराबादमध्येच वैज्ञानिकांनी व अभियंत्यांनी ‘सूअर क्रॉक’ असं एक यंत्र तयार केलं आहे. याव्यतिरिक्त माध्यमांद्वारा प्रकाशात न आलेले काही प्रयत्नही असू शकतील. तर, अशा प्रयत्नांना प्रशासनानं सक्रियरित्या पाठबळ द्यायला हवं, त्यांची प्रशंसा करायला हवी. गटारं व नाल्यांची यंत्रांद्वारे सफाई करण्यासंबंधीच्या कृतियोजना दिल्ली सरकारलाही मिळालेल्या आहेत. नालेसफाई यंत्रं विकत घेण्यासाठी व त्यांच्या वापरासाठी आवश्यक कर्ज सफाई कर्मचाऱ्यांमधीलच ‘उद्योजकां’ना देण्याचा प्रस्तावही दिल्ली सरकारच्या विचाराधीन असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. पण यातून कामगारांना गंभीर अडचणींना सामोरं जावं लागेल, त्यामुळं सरकारनंच ही यंत्रं विकत घेऊन त्यांच्या उपयोजनासाठी लोकांना रोजगारावर ठेवणं जास्त उचित राहील.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कामगारांना योग्य सुरक्षासाधनं पुरवण्यात आली, तिथं ही साधनं प्रचंड बोजड व अडचणीची असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा वेळी सुरक्षासाधनं बाजूला ठेवून काम करणं कामगारांना अधिक सोयीचं वाटतं. त्यामुळं अधिक हलक्या वजनाचे वेश व इतर सुरक्षासाधनं तयार करण्यासाठी सातत्यानं प्रयोग होणं गरजेचं आहे. पण मुळात कामगारांचे जीव अधिकारीसंस्थांना इतके महत्त्वाचे वाटतात का? सफाईसाठी यंत्रांचा वापर करण्याबाबत अनास्था आहेच, त्यात भर म्हणजे कंत्राटी सफाई कामगारांचं प्रमाण प्रचंड आहे- खुद्द सरकारच- विशेषतः भारतीय रेल्वे- सफाईसाठी सर्वाधिक कंत्राटं काढते.

विद्यमान सरकारनं तंत्रज्ञान व अभिनवतेच्या मोठमोठ्या बढाया मारलेल्या आहेत, तर सफाई कामगारांच्या क्रूर व अनावश्यक कारणांमुळं होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी या अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करणं सर्वाधिक गरजेचं आहे.

Back to Top