ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

सैनिकी राष्ट्रवादाच्या विरोधात

झिऑनिझम (ज्यू राष्ट्रवाद) आणि हिंदुत्ववाद हे ज्यू धर्म व हिंदू धर्म यांचं प्रतिनिधित्व करत नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

प्रदीर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धामध्ये सोव्हिएत युनियनवर अमेरिकेनं विजय मिळवला आणि सोव्हिएत युनियन मोडून पडलं, त्यानंतर भारत व इस्राएल यांच्यात १९९२ साली संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधांना २५ वर्षं पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून इस्राएली पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू १४ ते १९ जानेवारी २०१८ या दिवसांमध्ये भारतदौऱ्यावर आले होते. यापूर्वी ४ ते ६ जुलै २०१७ या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलचा दौरा केला होता. पॅलेस्टाइनमध्ये ज्यू ‘राष्ट्रभूमी’ स्थापन करण्याचं आश्वासन ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी झिऑनिस्टांना (ज्यू राष्ट्रवाद्यांना) दिलं होतं, त्यानुसार १९१७ साली ‘बालफोर जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात आला, त्याचा शंभरावा वर्धापनदिन साजरा होत असताना मोदींनी हा दौरा केला. झिऑनिस्ट नेतृत्वानं इस्राएल देशाची घोषणा १४ मे १९४८ साली केली होती, पण त्याचा सत्तरावा वर्धापनदिन या वर्षी होणार आहे. त्या वेळी वसाहतवादाची सामूहिक स्मृती बरीच पक्की होती. इस्राएलच्या निर्मितीसाठी क्रूरपणे हटवण्यात आलेल्या आणि वंचना सहन करणाऱ्या पॅलेस्टिनींच्या अधिकारांचा भंग झाल्याची दखल नेहरूकालीन भारत सरकारनं घेतली होती.

झिऑनिझम ही एक वसाहतवादी आणि वंशश्रेष्ठत्वाची विचारसरणी होती आणि आहे. अरबांच्या एतद्देशी जनतेला हुसकावून लावण्याचं आणि त्यांना मानवाधिकारही नाकारण्याचं समर्थन ही विचारसरणी करते. झिऑनिझमला विरोध म्हणजे ज्यूविरोध नव्हे किंवा ज्यूद्वेष नव्हे. पॅलेस्टिनींविरोधातील आपली क्रूर कृत्यं जगभरातील ज्यूंच्या नावाखाली सुरू असल्याचा दावा करणारा इस्राएल सर्व ज्यूंच्या मानवतेलाच धोका उत्पन्न करणारा ठरतो. झिऑनिस्ट नेतृत्वाखालील इस्राएलनं बळानं पॅलेस्टिनी भूमीचा ताबा घेतलेला आहे. इस्राएलची राज्यसंस्था पॅलेस्टिनींना समपातळीवरून वागणूक देण्यास नकार देते. इस्राएली उप-साम्राज्यवादाविरोधातील पॅलेस्टिनी मुक्तीलढा हा अरब जगतामधील साम्राज्यवादाशी साथसंगत करणाऱ्या प्रतिगामी सत्तांविरोधातील व्यापक संघर्षाचा भाग आहे. वॉशिंग्टनच्या पाठिंब्यावर १९४८, १९६७ आणि १९७३ या तीन युद्धांदरम्यान इस्राएलनं जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडील संपूर्ण प्रदेशावर प्रत्यक्ष ताबा मिळवलेला आहे. पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्याच भूमीवर मर्यादित आणि नियंत्रित प्रवेश दिला जातो, त्यांना अतिशय निष्ठूरपणे अंकित ठेवलं जातं.

नेहरूंनंतरच्या भारतातील राजकीय मध्यस्थांनी कितीही निरनिराळ्या भूमिका घेतल्या, तरी त्यांचा पॅलेस्टाइनच्या प्रश्नासंबंधीचा खरा रंग १९९१ साली प्रकट झाला. झिऑनिझम हा वंशवाद आहे, असं प्रतिपादन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला भारतानं १९७०च्या दशकाच्या मध्यात पाठिंबा दिला होता, परंतु १९९१ साली भारतानं या ठरावाच्या विरोधात मतदान केलं. गेल्या २५ वर्षांमधील इस्राएलसोबतचे भारताचे संबंध हे मुख्यत्वे सैनिकी स्वरूपाचे आहेत. इस्राएली शस्त्रांची विक्री, देशांतर्गत सुरक्षेविषयी इस्राएलची सल्लागार सेवा, तथाकथित दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर सेवा यांमध्ये हे संबंध अधिक पसरलेले आहेत. भारत आता इस्राएलची सर्वांत मोठी शस्त्रास्त्र बाजारपेठ बनला आहे. ‘जेन्स टेररीझम अँड सिक्युरिटी मॉनिटर’च्या गतकाळातील अंकांनुसार, भारतीय पलटणी आणि गुप्तचर संस्थेतील कर्मचाऱ्यांना इस्राएलकडून प्रशिक्षण मिळतं आहे. पॅलेस्टिनी लढवय्यांविरोधात इस्राएली संरक्षण दलं आणि मोस्साद ज्या प्रकारचे विद्रोहविरोधी डावपेच वापरतं, तेच भारतात (काश्मिरी बंडखोरांविरोधात) वापरण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जातं आहे.

नेतान्यहू यांच्या दौऱ्यारम्यान कोणत्याही नवीन संरक्षणविषयक कार्यक्रमांची किंवा कंत्राटांची घोषणा झाली नसली, तरी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात इस्राएलची थेट परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञानाचं हस्तांतरण व्हावं यासाठी भारतानं निश्चितपणे प्रयत्न केले (‘भारत-इस्राएल संयुक्त निवेदन’, १५ जानेवारी २०१८). शिवाय, ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन’चं ‘देशी’ बनावटीचं रणगाडाविरोधी अस्त्र तयार होण्याची वाट न बघता इस्राएलच्या ‘राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्स’चं ‘स्पाइक’ हे रणगाडाविरोधी अस्त्र आयात करण्यासाठी भारतीय सैन्य उतावीळ झालेलं आहे, त्यामुळं या संदर्भातील आंतरसरकारी करार लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं संयुक्तरित्या विकसित करणं, गेल्या वर्षी इस्राएली हवाई दलानं आयोजित केलेल्या हवाई लढा कवायतीमध्ये भारतीय हवाई दलानं घेतलेला सहभाग आणि आता ‘दहशतवादविरोधामधील सर्वांगीण सहकार्य’- या सर्व घडामोडींचा विचार करता भारताची सत्ता हिंदुत्ववादी नेतृत्वाकडं गेल्यानंतर भारत-इस्राएल यांच्यातील सैनिकी-सामरिक संबंध कधी नव्हे एवढे वेगानं पुढं चालले आहेत, हे नक्की.

हिंदुत्ववाद्यांना झिऑनिस्टांच्या सैनिकी राष्ट्रवादाचं आकर्षण कायमच वाटत आलेलं आहे. परंतु, आता ‘दहशतवादविरोधातील सर्वांगीण सहकार्य’ करताना भारतीय नेतृत्व इस्राएलचं आणखी अनुकरण करेल की काय? पॅलेस्टिनी लोकांना झिऑनिस्ट सत्ताधारी जी वागणूक देतात तशीच काश्मिरी लोकांना मिळावी अशी धोरणं आखली जातील की काय? असे प्रश्न उपस्थित होतात. ज्यू धर्म आणि झिऑनिझम यांच्यात फरक करता यायला हवा, त्याचप्रमाणे हिंदू धर्म आणि हिंदुत्ववाद यांच्यातही फरक करता यायला हवा. हिंदू धर्म हा धार्मिक धारणा व श्रद्धांचा संचय आहे, त्यात अध्यात्मिक मुक्ती हे ध्येय आहे. तर, हिंदुत्ववाद ही फॅसिस्ट विचारसरणी आहे- किंबहुना नाझीवादाचं हे भारतीय रूप आहे. झिऑनिझम हे ज्यू धर्माच्या विरोधात जाणारं तत्त्व आहे, त्याचप्रमाणे हिंदुत्ववा हे हिंदू धर्मालाच छेद देणारं तत्त्व आहे. झिऑनिस्ट आपलं प्रतिनिधित्व करत नाहीत, असं ज्यूंना ठासून सांगावं लागतं. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी आपलं प्रतिनिधित्व करत नाहीत हे हिंदूंनीही जाहीर करण्याची वेळ आली आहे. या लढ्यामध्ये हिंदू, ज्यू किंवा मुस्लीम या सर्वांनी मानवता व पॅलेस्टाइन, मानवता व काश्मीर यांच्या बाजूनं उभं राहायला हवं. ज्यूद्वेष (ज्यू आणि इतर सेमाइट- यांमध्ये पॅलेस्टिनीही आले- यांच्याविरोधातील पूर्वग्रह) आणि मुस्लीमविरोध (मुस्लिमांविरोधातील पूर्वग्रह) यांनाही आपण संपुष्टात आणायला हवं.

Back to Top