ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

विषारी हवा

हवा प्रदूषणामुळं भारतात लाखो लोकांचा- विशेषतः गरीबांचा जीव जात आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे प्रदूषणाच्या मुद्द्यावर नकारार्थीच प्रतिसाद देताना दिसतात. भारतात हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याची वस्तुस्थिती त्यांना नाकारता येत नाही, पण देशाबाहेरच्या लोकांनी ही परिस्थिती आपल्यासमोर मांडलेलं मात्र त्यांना आवडत नाही. बोस्टनस्थित ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट’ व सिआटेलमधील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’ या संस्थांनी संयुक्तरित्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१७’ हा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला. हवा प्रदूषणामुळं होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत चीनच्या तुलनेत भारताचा क्रमांक खूप खालचा लागतो, असं या अहवालात नोंदवलं होतं. यावर तक्रारवजा प्रतिक्रिया देताना दवे म्हणाले, “आपण भारतीय लोक भारताबाहेरच्या गोष्टींनी खूपच जास्त प्रभावित होत असतो”. “आपल्या सैन्यावर माझा जितका विश्वास आहे” तितकेच विश्वासू असलेले या विषयासंबंधीचे तज्ज्ञ आपल्या देशात आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, असं दवे म्हणाले. विज्ञानातील तज्ज्ञ आणि सैन्य यांच्यातील ही विचित्र तुलना बाजूला ठेवून पाहिलं, तरी मंत्रीमहोदयांनी सदर अहवालाला दिलेला बचावात्मक प्रतिसाद गोंधळवणारा आहे. हवा पद्रूषणातील वाढीमुळं झालेल्या मृत्यूंची संख्या निश्चित करताना या अहवालात वापरण्यात आलेल्या पद्धतीविषयी काही लोक खुसपटं काढू शकतील, पण वाढतं अनारोग्य व मृत्यू यांना कारणीभूत ठरणारं हवा प्रदूषण ही भारतातील एक गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे, हे मान्य करावं लागेल.

हवा प्रदूषणाची पातळी दाखवणारी अधिकृत आकडेवारी आणि ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ (जीबीडी/आजारांचा जागतिक ताण) हा सखोल अहवाल यांच्या आधारे ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर’ हा अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये हवा प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम जोखण्यात आले आहेत. १९९० ते २०१५ या २५ वर्षांच्या काळातील १९५ देशांमधील आरोग्यविषयक आकडेवारीचं संकलन जीबीडी अहवालात केलेलं आहे. दर वर्षी या संकलनाचं अद्ययावतीकरण केलं जातं. विविध देशांमधील लोकसंख्या, वयोगट व काळाचा मोठा पट यांना सामावून घेणारा हा अहवाल आरोग्यविषयक आकडेवारीची तुलना करण्यासाठी उपयोगी ठरतो. या माहितीला हवा प्रदूषणासंबंधीच्या आकडेवारीची जोड दिल्यावर या प्रदूषणामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्या आणि त्यासंबंधित पंगुत्वाचे आजार यांची आकडेवारी काढता येते. यातील हवा प्रदूषणाची पातळी जोखताना विशेषकरून सूक्ष्म कण पदार्थ (फाइन पर्टिक्युलेट मॅटर: पीएम२.५) व ओझोन यांचा विचार केला जातो. या प्रदूषणकारी घटकांशी- विशेषतः पीएम२.५ दीर्घ काळ संपर्क आल्यास हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांना बाधा पोचते आणि श्वसनाचे विकार निर्माण होतात, परिणामी आयुर्मान कमी होतं. खासकरून लहान मुलांना व वृद्धांना याचा जास्त त्रास होतो. ओझोनशी संपर्क आल्यास फुफ्फुसाचे गंभीर आजार उद्भवतात हे आता पुरेसं सिद्ध झालं आहे. या पार्श्वभूमीवर २०१५ या वर्षामध्ये हवा प्रदूषणामुळं जगभरात ४२ लाख मृत्यू झाले, त्यातील ५२ टक्के मृत्यू भारत व चीन इथं झाले, असं ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर’ अहवालात म्हटलं आहे. प्राणघातक हवा प्रदूषणाच्या वाढीचा दर मंदावण्यासाठी चीननं पावलं उचलली आहेत, पण भारताचा हा दरही चढता क्रमच दाखवतो आहे.

यामागील कारणं काही गूढ स्वरूपाची नाहीत. हवेतील प्रदूषणकारी घटकांचा तणाव कमी व्हावा, यासाठी कठोर उपाय अंमलात आणले जायला हवेत, पण आत्तापर्यंत भारतातील सरकारांनी ही समस्या गांभीर्यानं घेतलेली नाही. दिल्लीसारख्या मोठ्या शहरांवरच लक्ष केंद्रीत करून आपण लहान शहरांसमोरील संकटाकडे दुर्लक्ष केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं २०१६ साली जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये १० शहरं भारतातील आहेत, त्यातील अलाहाबाद, कानपूर, फिरोझाबाद व लखनौ यांची परिस्थिती सर्वांत वाईट होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं २०१५ साली केलेल्या एका अभ्यासानुसार, देशातील तीन सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये वाराणसीचा समावेश होता. हा अभ्यास ‘आपल्या’चं वैज्ञानिकांनी केलेला असल्यामुळं दवे यांना त्याकडे तरी दुर्लक्ष करता येणार नाही.

दिल्लीसारख्या शहरातील प्रदूषणाच्या पातळीची आकडेवारी मोजली जाते, कारण तिथं या मोजणीसाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उपस्थित आहे. वाराणसीमध्ये मात्र प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी केवळ तीन परीक्षण-यंत्रं आहेत, त्यातील केवळ एकाच यंत्रात पीएम२.५ घटकाची मोजणी होऊ शकते आणि या तीनपैकी कोणतंच यंत्र हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दाखवू शकत नाही. याउलट दिल्लीमधील १३ परीक्षण-यंत्रांद्वारे पीएम१० व पीएम२.५ अशा दोन्हींची मोजणी होऊ शकते आणि ही यंत्रं हवेच्या गुणवत्तेचा दैनंदिन निर्देशांकही  दाखवतात. आपल्या शहरांमधील हवा प्रदूषणाच्या व्याप्तीचं परीक्षण करण्यातही आपण अपयशी ठरत असू, तर इथल्या रहिवाशांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा अंदाज आपण कसा बांधणार आहोत? हवा प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणेची आपल्याकडील दुरवस्था पाहता, ‘स्टेट ग्लोबल एअर’ अहवालासारख्या अभ्यासांवर विसंबण्याखेरीज दुसरा काही पर्याय आपल्यासमोर आहे का? मंत्रीमहोदय सूचवतात त्याप्रमाणे मृत्यू व अनारोग्य यांच्याशी संबंधित हवा प्रदूषणाविषयी भारतीय तज्ज्ञ स्वतःचे अभ्यास सादर करत नाहीत तोपर्यंत आपण थांबण्याची गरज खरोखरच आहे का? खरंतर भारतभरातील शहरांमधून व गावांमधून विश्वासार्ह आकडेवारी जमवण्याचा प्रयत्न आपण प्रत्यक्षात केलाच, तर ‘परकीय’ अहवालापेक्षाही भीषण परिस्थिती समोर येण्याची शक्यता जास्त आहे.

हवेच्या ढासळत्या गुणवत्तेचा सर्वाधिक परिणाम गरीबांवर होतो, हे वास्तवही आपण सहजपणे विसरतो. आपल्या घरांसाठी महागडी एअर-प्युरिफायर यंत्रं विकत घेऊन आणि एअर-कंडिशन असलेल्या गाड्यांमधून फिरून श्रीमंत लोक स्वतःचं रक्षण करू शकतात. पण गरीबांना चालताना, किंवा सायकलवरून जाताना किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना खराब हवेत श्वासोच्छवास करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. या रोजच्या विषारी हवेचा डोस त्यांना घ्यावा लागतोच, शिवाय त्यांची घरंही हवेशीर नसतात आणि बहुतेकदा अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून लाकूड किंवा गाईच्या सुकलेल्या शेणाचा वापर ते करतात. या पार्श्वभूमीवर, संकटाची सूचना देणारा माहितीस्त्रोत कोणताही असू दे, परंतु सरकारनं या समस्येचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही, तर अनारोग्य व अपुरं पोषण यांनी ग्रस्त असलेले लाखो गरीब लोक आणखी दुरवस्थेत जातील.

Updated On : 13th Nov, 2017
Back to Top