ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

विनोद आणि संताप यांचं सहअस्तित्व असू शकतं का?

चांगलं व्यंग्यचित्रानं चेहऱ्यावर हसू उमटण्यापेक्षाही डोक्यात विचार उमटणं अधिक महत्त्वाचं असतं.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

हा मजकूर एन. पोन्नप्पा यांनी लिहिला आहे. पोन्नप्पा हे विख्यात व्यंग्यचित्रकार असून इपीडब्ल्यूमध्ये ते ‘लास्ट्स लाइन्स’ या सदराखाली चित्रं काढतात.

व्यंग्यचित्रामध्ये तीन नग्न पुरुष रेखाटल्याबद्दल तामीळनाडूतील जी. बाला यांना २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. या तीन पुरुषांपैकी एकाच्या गळ्यात टाय बांधलेला होता, एकाच्या डोक्यावर टोपी होती आणि तिघांनीही त्यांची लिंगं झाकण्यासाठी नोटांची पुडकी हातात धरली होती. त्यांच्या पायाशी एक उपडं पडलेलं बाळ दाखवलं आहे, ते भाजल्याचं दिसतं आहे, पण त्याच्या पाठीवर अजूनही ज्वाळा आहेत. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर २०१५ साली मृतावस्थेत आढळलेल्या अयलान कुर्दीया स्थलांतरित बालकाशी साधर्म्य सांगणारी, परंतु त्यापेक्षा भयानक अशी या व्यंगचित्रातील प्रतिमा आहे. तिरुनेलवेली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या दोन मुलांना, पत्नीला आणि स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न एका मजुरानं अलीकडंच केला, त्यावर हे व्यंगचित्र आधारलेलं होतं. रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुराला एका सावकाराकडून छळ सहन करावा लागत होता, त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडं सहा वेळा तक्रार करूनही काही दाद न मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचललं.

बाला त्यांची चित्रं समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करतात, तिथं ते बरेच लोकप्रियही आहेत. प्रस्तुत व्यंग्यचित्राखाली त्यांनी तामीळमध्ये टिप्पणी लिहिली होती, त्याची दोन भाषांतरं वेगवेगळ्या बातम्यांमधून नोंदवलेली दिसतात: “हां, होय... हेच ते आक्रमक व्यंग्यंचित्र,” आणि “होय.. मी अत्यंत संतप्त असताना हे व्यंग्यचित्र काढलं.” या भाषांतरांचा सूर संदिग्ध वाटतो, आणि दोन्हींमध्ये फारसं साम्य नाही. परंतु कोणत्याही व्यंग्यचित्रानं वाचकाच्या चेहऱ्यावर ‘हसू’ उमटवण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात ‘विचार’ उमटवणं जास्त महत्त्वाचं असतं. विनोदाची अनेक अंगं असतात, परंतु यात ‘संतापा’ला जागा नाही, हे खेदानं नमूद करावं लागेल. ‘विनोद’ आणि ‘संताप’ हातात हात घालून चालू शकत नाहीत, व्यंग्यचित्र असेल तरीही हे शक्य नाही. सदर प्रकरणात आपण संतापातून व्यंग्यचित्र रेखाटल्याचं कलावंत मान्य करतो आहे.

व्यंग्यचित्र रेखाटण्याच्या दृष्टीने शोकांतिका हा अतिशय अवघड विषय आहे. त्याचं चित्रण करायचं असेल तरी ते सूक्ष्म असावं लागतं. या प्रकरणातील बाला यांचं व्यंग्यचित्र थेट आहे. त्यांनी बालक दाखवलं आहे, ते पीडित आहे, जळतं आहे. या व्यंग्यचित्रात तीन अधिकारी आहेत, बेढब नग्न शरीरं आहेत, त्यांनी त्यांचे गुप्त अवयव नोटांनी झाकलेले आहेत- या निश्चनीकरणानंतरच्या नवीन नोटा असाव्यात! व्यंग्यचित्रांच्या बाबतीत हा निषिद्ध प्रदेश आहे.

सावकारीमध्ये अवाजवी व्याजदरानं कर्ज दिलं जातं. सावकारानं छळ केल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली, त्यातूनच नंतर हे चित्र काढलं गेलं. परंतु, या घटनाक्रमातील मुख्य कारण असलेला सावकार यात कुठंच दिसत नाही. संबंधित चित्रकारानं आपल्या कामासाठी आणखी वेळ दिला असता आणि अधिक सखोल विचार केला असता, तर त्याला उचित अथवा अनुचित रेखाटनाद्वारे तिसस्कारजन्य सावकारालाही या चित्रात सहज गुंफता आलं असतं, त्यामुळं तीन नग्न अधिकाऱ्यांबाबतची तीव्रताही कमी झाली असती. आपल्याला नग्न दाखवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन आठवड्यांनी अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा बाला यांना त्यांच्या घरातून उचललं आणि तुरुंगात डांबलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य लाज सोडून नाचत असतं अशा समाजमाध्यमांमधून हे व्यंग्यचित्र मोठ्या प्रमाणात पसरलं. अशा प्रकारच्या गोष्टींना समाजमाध्यमं चुचकारतात. छापील माध्यमांमध्ये संपादकाच्या देखरेखीखाली कामकाज चालते, अशी दृष्टी या बेफिकीर समाजमाध्यमांबाबत अस्तित्वातच नाही. बाला यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे हे व्यंग्यचित्र संतापातून काढले गेले आहे, तसं करताना त्यांनी सभ्यता व अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विशिष्ट मर्यादेत महत्त्वाचं असतं, परंतु या व्यंग्यचित्राच्या निर्मितीमध्ये या स्वातंत्र्याची कोणतीही भूमिका नाही.

व्यंग्यचित्रं थेट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणं ही नवीन टूम आहे. रचनात्मक अथवा निर्बुद्ध अशा सर्व प्रकारच्या टिप्पण्या, टोमणे, टीका हे सगळं या माध्यमांवर तत्काळ होतं. ‘फॉलोअर’ दयाळू व प्रशंसक असावा, असं काही गरजेचं नाही. सर्वांसाठी मुक्त वावर असलेली ही अवस्था आहे. त्याला कोणतंही बंध नाही. समाजमाध्यमांवर छापील माध्यमांपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य आहे, परंतु निष्काळजी व्यंग्यचित्रकारासाठी यामध्ये बराच धोकाही आहे, आणि ते योग्यच आहे.

व्यंग्यचित्रांच्या ग्रहणाच्या बाबतीत छापील माध्यमांमध्ये अधिक मोकळेपणा व सहिष्णूता गतकाळामध्ये दिसून आलेली आहे, असं व्यापक चौकटीचा विचार करता निदर्शनास येतं. परंतु काहीच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली व्यंग्यचित्रं पुन्हा प्रकाशित करायची असतील, तर आता काळजीपूर्वक पुनर्विचार करावा लागेल. विचारांचं धृवीकरण झालं आहे, हा एक भाग झाला. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आता अधिक व्यापक वाचक-प्रेक्षकवर्गाचा अदमास बांधून अशी कृती करावी लागेल. या देशातील समाज आता अधिक लहान गटांमध्ये विभागला आहे आणि जाणता वा अजाणता कोणत्याही कमी-अधिक कृतीनं ते दुखावले जाण्याची शक्यताही वाढली आहे.

व्यंग्यचित्रकाराला आपल्या चित्रातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे, त्याहून भिन्न अर्थ व्यंग्यचित्रातून काढले जाऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर, सद्यकाळामध्ये व्यंग्यचित्र काढताना आधीपेक्षा जास्त विचार करावा लागतो. छापील माध्यमं संपादकांच्या उपस्थितीमुळे व्यंग्यचित्रकारांसाठी सुरक्षित ठरतात. तो किंवा ती व्यंग्यचित्र प्रकाशित होण्यापासून थांबवू शकतात. काही दशकांपूर्वी ‘आनंद विकटन’ या तामीळ नियतकालिकामध्ये आमदारांचं गैरचित्रण करणारं व्यंग्यचित्र प्रसिद्ध झालं होतं, त्यानंतर तिथले संपादक अडचणीत सापडले. व्यंग्यचित्रकार सुटला. चांगल्या संपादकाची उपयुक्तता कमी लेखता येणार नाही!

Updated On : 14th Nov, 2017
Back to Top