दास कॅपिटल, खंड पहिला- १५० वर्षं
जागतिक भांडवली व्यवस्थेतील एका शोषित देशामधील भांडवली प्रक्रियेविषयीचं आकलन करून घेताना मार्क्सचा ‘दास कॅपिटल’चा पहिला खंड आणि त्याचं इतर काही लेखन नक्की कशा प्रकारे सहाय्यकारी ठरतं?
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
‘इपीडब्ल्यू’च्या संपादकीय चमूमधील बर्नार्ड डी’मेलो यांनी हा लेख लिहिला आहे:
कार्ल मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’चा पहिला खंड जर्मनीतील हॅम्बर्ग इथं प्रकाशित झाला त्या घटनेला सप्टेंबर २०१७मध्ये १५० वर्षं पूर्ण होत आहेत. (पहिल्या खंडाचं इंग्रजी भाषांतर मात्र १८८७मध्ये प्रकशित झालं. त्यापूर्वी १८७२मध्ये रशियन भाषेत- पहिल्यांदाच एका परकीय भाषेत- त्याचं भाषांतर प्रकाशित झालं होतं). सप्टेंबर १८६७मध्ये जर्मनमध्ये ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. जागतिक भांडवली व्यवस्थेतील एका शोषक देशामधील भांडवली विकासप्रक्रियेच्या आकलनासाठी भौतिक विरोधविकासवादाची पद्धत पहिल्यांदाच यशस्वीरित्या वापरण्याचं काम या ग्रंथातून झालं. त्यामुळं राजकीय अर्थशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांच्या इतिहासाला नवीन वळण देणारी ही घटना होती. मार्क्सनं अभिजात राजकीय अर्थनीतीच्या चिकित्सेसाठी भौतिक विरोधविकासवादाची पद्धती वापरून या अर्थशास्त्रीय विचारात परिवर्तन घडवलं. कॅपिटलमध्ये अमूर्तस्वरूपात सिद्धान्तन आहे आणि मूर्त स्वरूपात इतिहास आहे, आणि या दोहोंमध्ये अपरिहार्य तणावही आहे. मार्क्सला याची अचूक जाणीव होती, त्यामुळं त्यानं दोन्ही घटकांवर एक-आड-एक भर देत त्यांचं महत्त्व ठसवलं.
अंतिमतः कॅपिटलचे तीन खंड प्रसिद्ध झाले: पहिला खंड १८६७ साली प्रकाशित झाला, त्याची सुधारीत आवृत्ती १८७२मध्ये आली; त्यानंतर दुसरा व तिसरा खंड मार्क्सच्या मृत्यूनंतर फ्रेडरिक एन्जल्सनं अनुक्रमे १८८५ आणि १८९४मध्ये प्रकाशित केले. भांडवलशाही इतिहासामध्ये एक व्यवस्था म्हणून कशी उलगडत गेली- तिचा उगम कसा झाला, तिचं कामकाज कसं चालतं, आणि ती संभाव्यतः कुठल्या दिशेनं जात आहे, याचं विश्लेषण हा मार्क्सच्या या ग्रंथाच्या गाभ्याचा भाग आहे. मूल्य, वरकड मूल्य, शोषणाचा दर (किंवा वरकड मूल्याचा दर), भांडवलाची सेंद्रीय रचना, नफ्याचा दर, सापेक्ष वरकड लोकसंख्या (किंवा औद्योगिक राखीव श्रम सैन्य), इत्यादी संकल्पनात्मक सामग्रीद्वारे मार्क्सनं अनेक अंतर्विरोधांचा शोध लावला: बदलाला चालना देणाऱ्या ऐतिहासिक शक्ती, समतोल साधणाऱ्या व्यवस्थात्मकशक्ती आणि त्यांच्यातील अस्वस्थकारक तणाव, असे ते अंतर्विरोध होत. या सैद्धान्तिक सामग्रीद्वारे त्यानं मूल्याच्या श्रम सिद्धान्ताची मांडणी केली, आणि भांडवलधारी/भांडवलनियंत्रक वर्गाकडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाचं विश्लेषण केलं. या मांडणीमध्ये त्यानं वरकड मूल्याचा उगम शोधला आणि हे मूल्य वाढवण्यासाठी भांडवली वर्गाकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींवरही प्रकाश टाकला.
महान इंग्रजी अभिजात राजकीय अर्थनीतीज्ञांपैकी एक गणला जाणाऱ्या डेव्हिड रिकार्डोपेक्षा अतिशय भिन्न प्रकारे मार्क्सनं संचय प्रक्रियेविषयीचा दृष्टिकोन मांडला. आर्थिक चक्र व संकटं यांमागील शक्ती, नफा दराची कोसळण्याची वृत्ती, आणि उपभोगक्षमतेच्या पलीकडं जाणाऱ्या उत्पादनक्षमतेची वृत्ती हे घटकही त्यानं उकलून दाखवले. त्याचसोबत भांडवलाचं संहतीकरण आणि केंद्रीकरण या प्रक्रियेवरही मार्क्सनं प्रकाश टाकला. केंद्रीकरणाच्या प्रक्रियेसाठी विलिनीकरण आणि संपादनाचे मार्ग वापरले जातात. मार्क्सनं केलेल्या भांडवली गतिमानतेच्या मांडणीमध्ये उत्पादन आणि पैसा व वित्त हे दोन्ही मध्यवर्ती घटक होते. आणि अर्थातच मार्क्सच्या आकलनात क्रांतिकारी श्रमिकाची उत्क्रांती व वृद्धी हाही एक महत्त्वाचा घटक या प्रक्रियेत होता. या सर्व परस्परसंबंधित प्रक्रिया ‘अशा बिंदूवर जाऊन पोचतात जिथं त्यांच्या भांडवली आवरणाशी त्या विसंगत ठरू लागतात’, त्यामुळं हे आवरण ‘अलग’ होऊन पडतं, ‘हीच भांडवली खाजगी मालमत्तेची मृत्युघंटा असते. स्वामित्वहरण करणाऱ्यांचंच स्वामित्वहरण होतं.’
मार्क्सच्या म्हणण्यानुसार, श्रमिकांचा विकास क्रांतिकारी वर्गात होतो आणि ते भांडवली सत्ता उलथवून टाकतात, ही अपरिहार्य प्रक्रिया आहे. मार्क्सनं त्याची भौतिक विरोधविकासवादाची पद्धती अवलंबली असली, तरी फसव्या ऐतिहासिक नियतिवादामध्ये तो वाहावत गेला, असं वाटतं. त्याच्या लेखनाची शैली आणि त्यातील प्रतिमासृष्टी, त्याच्या गद्यामधील भव्यता, भांडवलाच्या दोषांचा पाढा वाचतानाची त्याची उत्कटता वाचकाला निश्चितपणे गुंतवून ठेवते (उदाहरणादाखल हे वाक्य पाहा: ‘भांडवल म्हणजे मृत श्रम असतं आणि व्हॅम्पायरप्रमाणे जिवंत श्रमाचं रक्त शोषूनच ते जगू शकतं. जितके श्रम ते शोषून घेईल तितका काळ ते जगतं’), क्रांतिकारी बदलाची गरज असल्याची जाणीवही करून देते, परंतु यामध्ये लेखकाचा मूळ उद्देश वाहावत जातो. क्रांतिकारी बदलाच्या गतीविषयी तो अवाजवी अंदाज बांधतो आणि अशा बदलामधील अडथळ्यांचा अंदाज नोंदवताना त्रोटकपणा दाखवतो.
अर्थात, ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ केवळ ‘राजकीय अर्थनीतीची चिकित्सा’ एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर अर्थशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यांचं मूलगामी अर्थनिर्णयनही त्यात आहे. उदाहरणार्थ, मार्क्सच्या क्रयवस्तुस्तोम (कमॉडिटी फेटिशीझम) या संकल्पनेचं अर्थनिर्णयन पुढीलप्रमाणे करता येईल: क्रयवस्तूंच्या जगात वैयक्तिक संबंध हे वस्तूंमधील संबंध म्हणून मूर्त होतात. आणि माझ्यासारख्या जुनाट व्यक्तीच्या दृष्टीनं, मानवी श्रम व स्वभाव यांच्या पिळवणुकीतून मालमत्तेचा उगम होतो हे सत्यही मार्क्सच्या लेखनातून सापडतं. खरंतर, मार्क्सला वाटणारी पर्यावरणाच्या समस्यांविषयीची आस्था आजच्या काळातील पर्यावरणीय समाजवाद्यांसारखी होती. समाज व निसर्ग यांच्यातील चयापचयक्रियेच्या संकल्पनेवर आधारित पर्यावरणीय व्यवस्थांचा दृष्टिकोन विकसित करण्याचे त्या काळात जे प्रयत्न सुरू होते त्याचाही मार्क्सवर खोल प्रभाव पडला होता. भांडवली उत्पादन ‘एकाच वेळी सर्व मालमत्तेच्या मूळ स्त्रोतांना- जमीन आणि कामगार यांना क्षीण करत असते’, असं ‘दास कॅपिटल’च्या पहिल्या खंडात लिहिलेलं आहे शिवाय, पहिल्या खंडातील तिसरा भाग ‘तथाकथित आदिम संचया’वरचा आहे. भांडवलशाहीचा उगम कसा झाला, याची चर्चा या भागात केली आहे. ब्रिटनमध्ये बंदिस्त शेतजमिनींच्या व्यवस्थेत (‘एनक्लोजर’ या नावानं परिचित) मजुरांचं स्वामित्वहरण होत असल्याच्या मुद्द्याची चर्चा मार्क्स इथं करतो. शिवाय, पर्यावरणीय धूप/ लूटमार ही जणू काही ‘भांडवली उत्पादनाच्या युगाची गुलाबी पहाट’ सूचीत करत होती, असं परखड निरीक्षणही नोंदवतो.
अर्थात मार्क्सनं ‘बूर्झ्वा अर्थव्यवस्थे’चं पद्धतशीर विवरण पूर्ण केलं नाही- विशेषतः भांडवली राज्यसंस्था, परकीय व्यापार आणि जागतिक बाजारपेठ या गोष्टी त्याच्या विवरणाच्या कक्षेत आल्या नाहीत, त्यामुळं जागतिक व्यवस्थेच्या स्वरूपातील भांडवलशाहीविषयीची सैद्धान्तिक रूपरेषा मांडली नाही. परंतु, आपण आधी पाहिल्याप्रमाणे पहिल्या खंडातील ‘तथाकथित आदिम संचय’ या भागामध्ये त्यानं उगवत्या भांडवलशाहीच्या प्रभावाची चर्चा केलेली आहे आणि जागतिक भांडवली व्यवस्थेचा परीघ त्यानंच बनलेला आहे. शिवाय, आधुनिक उद्योगांमधील यंत्रांचा वापर आणि वासाहतिक प्रभुत्व यांतून मिळालेल्या स्पर्धात्मक लाभामुळं युरोपीय देशांनी ‘त्यांच्या अंकित देशांमधील सर्व उद्योग बळजबरीनं उचकटून टाकले’, या प्रक्रियेचीही मांडणी त्यानं यंत्रं व आधुनिक उद्योगांसंबंधीच्या प्रकरणात केली आहे. जागतिक व्यवस्थेच्या स्वरूपातील भांडवलशाहीमधील शोषणाधारीत केंद्र-परीघ संबंधांची जाणीव मार्क्सला होती.
गेल्या दीडशे वर्षांमध्ये या जागतिक व्यवस्थेतील केंद्रस्थानी असलेल्या भांडवलशाहीचा विकास आणि परिघाच्या अविकासाचा विकास या वास्तवाचा लेखाजोखा ‘दास कॅपिटल’च्या चौकटीत घेतला, तर पुढील बाजू कदाचित प्रस्तुत ठरतील. आपल्या कामाचा नफा, आपण पिकवत असलेल्या जमिनीचं भाडं, आपल्या साठलेल्या कर्जावरील व्याज, एवढंच नव्हे तर आपल्या ‘वेतना’चाही काही भाग ‘भांडवलशहां’साठी सोडून देण्याचं बंधन गरीब शेतकऱ्यांवर असतं- हे शेतकरीही ‘श्रमिक’ वर्गाचा भाग ठरतील. व्यापारी भांडवलात औपचारिकरित्या अंतर्भूत करण्यात आलेले केवळ लघुउत्पादकही ‘श्रमिक’ वर्गाचा भाग ठरतील. शिवाय, व्यापारातील विषम विनिमयामुळं ‘वरकड’ मूल्यापासून वंचित राहिलेलेही याच वर्गाचा भाग ठरतील.
श्रमिकीकरणाची कमी पातळी, वेतनाधारित श्रमाच्या सक्रिय लोकसंख्येच्या तुलनेत श्रमाच्या राखीव लोकसंख्येचं प्रचंड प्रमाण, यांमुळं नियमित व अनियमित वेतन कामगारांच्या वेतनावर आणि इतर मागण्यांवरच मर्यादा येते. शिवाय, बाजारपेठांमधील तीव्र स्पर्धा असलेल्या पुरवठाक्षेत्रामधील लघुउत्पादकांच्या उत्पादक किंमतींवरही त्याचं नियंत्रण राहातं. एकूण जागतिक भांडवली व्यवस्थेच्या नफा कमावण्याच्या क्षमतेला या प्रक्रियेतून पुष्टी मिळते. त्यातून निर्माण झालेलं दारिद्र्य अशा बिंदूपर्यंत जाऊन पोचतं जिथं जनतेच्या सापेक्ष क्रयशक्तीची वाढ रोखून धरली जाते, त्यामुळं उपभोगक्षमता घटते आणि अतिरिक्त क्षमतेत वाढ होते, त्यामुळं नवीन गुंतवणुकीवरील संभाव्य नफा कमी होतो, आणि त्यातून गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती खचत जाते.