ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

जुनैदच्या हत्येचा निराळा संदर्भ

द्वेषाच्या राजकारणाविरोधातील प्रत्येक निषेधाचं स्वागत करावं अशी सध्याची स्थिती आहे.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

गोहत्येच्या संशयावरून एखाद्या व्यक्तीला जमावानं जीवेमारल्याच्या वीसहून अधिक घटना गेल्या सहा महिन्यांमध्ये घडल्या आहेत. परंतु, बावीस जून रोजी दिल्लीहून मथुरेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पंधरा वर्षीय जुनैद खान याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आधीच्या घटनांच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याचं दिसतं आहे. जुनैद वयानं लहान होता, किंवा ईदसाठी खरेदी करून तो घरी परतत होता, एवढ्याच कारणामुळं या प्रतिक्रिया उमटल्या, असं नाही. कोणालाही हानी न पोचवलेल्या या तरुण मुलाची हत्या केवळ तो मुस्लीम होता आणि तो मुस्लीम असल्याचं सहज ओळखू येत होतं, या एकमेव कारणावरून झाली, हा मुद्दा भावनांना हात घालणारा ठरला असावा. जुनैदच्या हत्येचा हा अतिशय चिंताजनक सूचकार्थ आहे: पवित्र गायीबद्दलचं प्रेम दाखवण्याचा मार्ग म्हणून अधिकृतरित्या द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या भारतामध्ये कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला केवळ तिच्या भिन्न पेहरावावरून हल्ल्याला सामोरं जावं लागू शकतं. गायीच्या नावावरून जमावाकडून हत्या होण्यास सुरुवात झाली तेव्हा भविष्यात या घडामोडींना हे वळण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं होतंच. गाय दिसतही नसली तरी गोमांस खाल्ल्याचा कल्पित संदर्भ कोणालाही लक्ष्य करण्यासाठी, हिणवण्यासाठी आणि जीव घेण्यासाठीही पुरेसा ठरू लागला आहेत.

जुनैदच्या हत्येमधून अनेक धडे घेण्यासारखे आहेत. इतर कोणत्याही सर्वसामान्य भारतीयाप्रमाणे तो आपल्या भावांसोबत खरेदी करून ट्रेननं प्रवास करत होता- स्वतःच्या कामाशी काम ठेवून होता. पण त्याला असं साधं जगण्याचीही परवानगी नव्हती. जागा पकडण्यावरून सुरू झालेल्या ‘भांडणा’चं रूपांतर द्वेषगुन्ह्यामध्ये झालं. जुनैद व त्याच्या भावांना ‘गोमांसभक्षक’ म्हणून चिडवण्यात येऊ लागलं, त्यांना ‘पाकिस्तानी’ संबोधण्यात आलं, त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या खेचण्यात आल्या, एका भावाची दाढी ओढण्यात आली आणि नंतर जमावानं त्यांच्यावर हल्ला चढवला, त्यांना मारहाण केली आणि अखेरीस त्यांच्यावर चाकूनं वार केले. अशा प्रकारच्या इतर हल्ल्यांमध्ये मारेकरी स्वतःला गोरक्षक म्हणवून घेतात, पण जुनैदच्या हत्येमध्ये एकसंध गट सहभागी झालेला नव्हता, तर मुस्लिमांविषयीच्या द्वेषातून एकत्र झालेल्या व्यक्तींनी केलेला हा गुन्हा होता. गर्दीनं भरलेल्या त्या डब्यातील एकाही व्यक्तीनं हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, हेही लक्षणीय आहे. याहून वाईट म्हणजे जुनैदला आणि त्याच्या भावांना ट्रेनमधून बाहेर ढकलण्यात आल्यावर रक्तबंबाळ अवस्थेतला जुनैद रेल्वेफलाटावर पडला होता, परंतु सुमारे दोनशे लोकांच्या गर्दीतील एकानंही त्याला मदत केली नाही, किंवा रुग्णवाहिला वा पोलिसांना बोलावलंही नाही. हे मौन तोडण्याची गरज आहे, लोकांच्या जीवनात पसरलेल्या द्वेषाला आणि गुन्ह्यातील अशा सहभागाला थांबवण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात इतरही अनेक जुनैद अशाच प्रकारे बळी पडण्याची भीती आहे.

भारतात २८ जून रोजी डझनभर ठिकाणी ‘नॉट इन माय नेम’ या घोषवाक्यासोबत रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी हे मौन तोडण्याचा प्रयत्न केला. साहजिकपणे या निदर्शकांना शहरी, उच्चभ्रू आणि अपरिणामकारक म्हणून दुर्लक्षिण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या निदर्शनांमधील सहभागी लोकांची संख्या किंवा त्यांचा गट या बाबी महत्त्वाच्या नाहीत, तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाशिवाय उत्स्फूर्तपणे लोक निदर्शनांसाठी जमले आणि लोकशाहीमध्ये निषेध व्यक्त करण्याचा नागरिकांचा अवकाश त्यांनी हक्कानं मागितला, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. केवळ मुस्लिमांची हत्या झाल्यावरच हे लोक निषेध का करतात, शेतकऱ्यांची हत्या झाल्यावर ते निषेध का करत नाहीत, काश्मिरी पोलिसाची हत्या झाल्यावर ते निषेध का करत नाहीत, दलितांच्या सामूहिक हत्या होतात तेव्हा हे लोक निषेध का करत नाहीत, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यातील काही प्रश्न उचित असले, तरी मुळात आत्तापर्यंत शांत बसलेले लोक आता रस्त्यावर उतरू लागलेत आणि बोलू लागलेत ही वस्तुस्थितीच जास्त महत्त्वाची आहे. निषेधाचं महत्त्व आणि मतभिन्नतेची समयोचितता यातून अधोरेखित होते आहे आणि यातून ऐक्य उभारण्याची गरजही दिसते आहे.

हिंदूराष्ट्र स्थापनेच्या अंतिम ध्येयाकडं क्रूर निर्धारानं वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना हातात फलक घेतलेल्या मोजक्या व्यक्तींमुळं काहीही फरक पडणार नाही, हे शक्य आहे. अशा वेळी राजकीय विरोधाची विखंडित व निराशाजनक अवस्था पाहाता व्यावक राजकीय प्रतिसाद दिला जाण्याची गरज आहे. दलित, शेतकरी व इतर वंचित समुदायांकडून झालेली निदर्शनं महत्त्वाची आहेत आणि बदल घडवण्यासाठी त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अर्थात, निदर्शनाची किंवा मतभिन्नतेची समयोचितता यशस्वी राजकीय परिणामावर विसंबून राहू शकत नाही. लोकशाहीमध्ये आणि हुकूमशाहीमध्येही लोक बोलू पाहातात, कारण राज्यसंस्था आपली मुस्कटदाबी करत असली तरी आपण बोलणं गरजेचं आहे असा विश्वास त्यांना वाटत असतो.

भारतातील सद्यस्थितीमध्ये हिंदू भारताची दृष्टी आपल्यावर लादली जात आहे, असं वाटणाऱ्या आणि अशा सक्तीशी असहमत असलेल्या नागरिकांना आक्षेप नोंदवण्यासाठी अनेक निमित्तं आहेत. ही दीर्घकालीन योजना अतिशय पद्धतशीरपणे अंमलात आणली जाते आहे, त्यामुळं संघ परिवाराचा भाग नसतील अशा बाकीच्या सर्वसामान्य हिंदूंनाही इतर समुदायांविषयीचा- आणि विशेषतः मुस्लिमांविषयीचा- द्वेष वैध असल्याचं वाटू लागलं आहे. जुनैदच्या हत्येबाबतचा हा मुद्दा अधिक लक्ष देण्यासारखा आहे: एखाद्या समुदायावर खलप्रवृत्तीचा शिक्का मारून त्या समुदायातील सदस्यांविरोधात सुट्या व्यक्तीही कोणतं तरी निमित्त साधून हल्ला करू शकतात. दैनंदिन पातळीवर द्वेषाच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं जातं आहे, त्यामुळं कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जीवाची व पोराबाळांची भीती सतावू लागली आहे. गतकाळामध्ये शिखांना अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आलेलं आहे, दलितांना नेहमीच अशा द्वेषाला बळी पडावं लागतं, ईशान्य भारतातील लोकांना त्यांचं ‘भारतीयत्व’ विश्वासार्ह असल्याचं सातत्यानं सिद्ध करावं लागतं, काश्मिरी लोक त्यांच्या राज्यबाहेर गेल्यावर त्यांना ते ‘दहशतवादी’ नसल्याचं सिद्ध करण्याची सक्ती केली जाते आणि आता मुस्लिमांना ‘गोमांसभक्षक’ म्हणून अलग पाडलं जातं आहे. याचा प्रतिकार होण्याची गरज आहे आणि सर्व प्रकारचे प्रतिकार या परिस्थितीत स्वागतार्ह ठरतात. सार्वजनिक अनास्था आणि अमानवता यांच्यावर क्रौर्याची इमारत उभी राहते. मतभिन्नता असलेल्या लोकांनी काहीच केलं नाही, तर मात्र हिंदूराष्ट्राची निर्मिती अपरिहार्य वास्तव बनेल.

Updated On : 13th Nov, 2017
Back to Top